उणीव

सावत्याचा पाय अडे

टाकटाकता मळ्यात

कपाशीचा धागा जाय

फास लावून गळ्यात

वेचवेचता कपाशी

रडरडते जनाई

तरी चोळीलुगड्याच्या

गाठीभेटीस मनाई

कापसाची वात जळे

धाप लागते दिव्याला

तरी काळोख वेढून

बसलेला कबीराला

उतू गेल्याने कपाशी

डोळा दिसते पुनीव

घरीदारी उजेडाची

फक्त सलते उणीव