अजुनी आपली कथा येते

दगडातूनही लता येते
हृदयाला तशी क्षमा येते

मधुचंद्रास जन्म-मृत्यूच्या
बघताना किती मजा येते

करते स्पष्ट अंतरे 'असणे'
नसण्याची तुझ्या नशा येते

कसले श्रेय आमचे आहे?
कविता घेत कल्पना येते

जग चर्चा करायला जमते
अजुनी आपली कथा येते

दिन रात्रीस होतसे काळा
दिवसा पांढरी निशा येते

ठिगळे फार जीवनाला या
मरणाची किती हवा येते!