शांतिसेना

कशाला कायदे आहेत येथे माणसासाठी?
मरावे मी किती वेळा 'जगावे' या सुखासाठी?

किती पर्याय होते ईश्वरा विश्वामधे साऱ्या
कशी ही शोधली आहेस जागा पावण्यासाठी?

तुझी आश्वासने होती, खरी केली तुझ्यासाठी
"तुझ्यासाठी जगावे मी, मरावे मी तुझ्यासाठी"

जरासा जन्म आहे, मागुनी हुरहुर ना लागो
नको देऊस सल्ला एकही माझ्या बऱ्यासाठी

मरण हा तोडगा आहे, नको जाणायला कोणी
कशी राहील आसक्ती कुणाला जीवनासाठी?

सुरक्षा नाव द्यावे की म्हणावी शांतिसेना ही
किती ही माणसे आहेत माझ्या एकट्यासाठी!

सहा संपून गेले, सातवा संपायला आला
किती दुष्काळ सोसावा तुझ्या त्या पावसासाठी!