कवितेमध्ये जान असावी
पण शब्दांना वजन नसावे
हलके फुलके येता जाता
सहजासहजी काव्य सुचावे
संध्याकाळी थकल्यानंतर
कवितेसंगत गप्पा व्हाव्या
गरम कॉफीच्या घोटासोबत
छान छान चारोळी चाखाव्या
वेळ असावी फुलपाखरू
हळूच भुर्रकन यावी जावी
खांद्यावर हुळहूळ करताना
खुदकन एक कविता निसटावी
साथ मुलायम संग सुरमयी
गंध मंद अन रंग सावळा
शब्दामध्ये मौन गोजिरे
मौनामध्ये शब्द कोवळा
चिमूट चिमूट चव हर शब्दाची
चाखून चोखून मस्त टिपावी
अर्थ असो वा ना शब्दांना
पण कवितेला जान असावी