जिणे शवाहुनीच त्रस्त जाहले असे तिचे

नवीन लग्न जाहले, मनात स्वप्नं दाटली
तनावरी मनावरी नवी सुखे पहाटली
स्वतःस आरशामधे बघून अर्चना म्हणे
कधीच जीवनात या अशी मजा न वाटली

मला बघून भाळला, मनात मी सुखावले
खुशाल हात मागताच मी उरी धपापले
घरात पोचला, पसंत जाहला घरातही
वधू करून घेतले, बघून धन्य जाहले

नवीन त्या घरात मी नवीन बावरूनशी
मनात लाज, पापणी जरा जरा झुकूनशी
खुणावुनी करीत स्पर्श छेडणे, सतावणे
अखंड प्रेम-मागणी तनी मनी भरूनशी

न सासरी कुणीच, त्यास मीच नी मलाच तो 
जरा उसंत मागताच चेहरा उदासतो
असा पती मिळायचा कुणास या जगामधे?
अखंड जीव लावतो, मलाच सर्व मानतो

शिजून अन्न चालले तरी मिठी सुटेचना
मधूर चुंबने कितीक, मालिका सरेचना
मिठीत रात जागली, सकाळ धुंद जाहली
मधू क्षणाक्षणात आणि चंद्र मावळेचना

असाच गोड, गोड काळ रोज रोज चालला
तश्यात मी पतीस एक प्रश्नही विचारला
रजा किती? कधी रुजू तुम्हास व्हायचे असे?
हसून बोलताच तो विचार खूप भावला

कशास नोकरी प्रिये? असेच राहुयात की
असाच काळ जन्मभर सुखात काढुयात की
तुला मिठीत घेतल्यावरी तहान-भूक ना
असेच आप-आपल्या मिठीत राहुयात की

सुखावले जरी, न स्वप्न वास्तवात चालते
पतीस बोलले असे कुठे जगात चालते?
पगार पाहिजेच ना अशी सुखे जपायला?
कळेल काय? काय आपल्या मनात चालते?

पती म्हणे, प्रिये मला न काम एकही इथे
मिळेल काम मुंबईस, जाउयात का तिथे?
लगेच अर्चना म्हणे, खुशाल जाउयात की
सुखे तिथेच लाभतात, काम लाभते जिथे

पती म्हणे, मलाच एकट्यास जायला हवे
मुळात काम शोधण्यासही फिरायला हवे
तिथे घराविना तुला कसे तसेच न्यायचे?
घरास शोधण्यास कामही मिळायला हवे

असे नका करू, तुम्ही व मीच जाउयात की
मिळेल कामही मला, तिथेच राहुयात की
तुम्ही जिथे नसाल, त्या घरात काय मी करू?
जसे असेल, साथ देत वाट काढुयात की

पती म्हणे, तसेच होउदे जसे तुझ्या मनी
तिथेच राहुयात एक रोजगार शोधुनी
तुला मला नसे कुणी जगात आपल्याविना
कशास वेगळे जगायचे विभक्त होउनी?

स्थलांतरीत जाहले, ठिकाण ते अनोळखी
कुठे रहायचे कळेचना, न ओळखे कुणी
पती निवांत, अर्चना बरीच बावरूनशी
पती म्हणे हसून आज पोचलोच शेवटी

तिला तिथून आणले हळूच बायडीकडे
म्हणे असा न माल बायडी मिळे कुणीकडे
अजाण अर्चना फसून पोचली कुठे अता
मनात स्वर्ग राहिला नि पाय दलदलीकडे

दहा हजार घेउनी पती खुशाल हासला
रडून अर्चनास जीव भार आज भासला
नको नको म्हणून हात जोडले तिने तिथे
नशीब पालटे अता, सबंध जन्म नासला

निराश अर्चना बघे, निघून चालला पती
बघून दुर्दशा, तिची खरेच कुंठली मती
अता न स्वप्न राहिली, अता न प्रेम राहिले
कळून सर्व मामला जायचीच शुद्ध ती!

कधीतरी बराच वेळ जाहल्यावरी बघे
मधेच शुद्ध येत आसपास बावरी बघे
कळायच्याच आत एक हात स्पर्शला तिला
कळेचना कुठे असु, शरीर सावरी, बघे

कुणी खुशाल मद्यपी हिडीस वागवे तिला
मनात विकृती असे, खुशाल नासवे तिला
असह्य दर्प, वासना बीभत्स, काय ती करे?
बघून एक क्षण जिवंतही न राहवे तिला

अशी सकाळ ना कधीच पाहिली असे तिने
जगात चांगलीच पाहिलीत माणसे तिने
तिला उपास हाल बायडीकडून लाभती
जगायचे तरी अशा जगामधे कसे तिने?

अता असेच चालते, जिवंत प्रेत अर्चना
नवीन माणसांस रोज भोग देत अर्चना
असो हमाल वा दलाल ती खुशाल साहते
शरीर देत, भाव होत, मोल घेत अर्चना

कुणी कमीच मोल देत भोगतो शरीर ते
कुणी कधी खुशाल मुफ्त चाहतो शरीर ते
दलाल, बायडी धनीक होत राहतात अन
नवीन रोज रोज भोग साहतो शरीर ते

पती मधेमधे तिथे नवीन माल आणतो
तिला बघून हासतो, पुन्हा तिलाच भोगतो
बनून भोग - यंत्र अर्चना पतीस साहते
करून मुफ्तची मजा पती पुन्हा सुखावतो

अता तिला लहान दोन जाहली मुले तिथे
लहानपण तिथेच नरक मोहल्यामधे फुले
न बाप सांगणे जमे, न शिक्षणे मुलांस त्या
दलाल फक्त व्हायची अशामधे तिची मुले

अता शरीर रोगग्रस्त जाहले असे तिचे
कधीच मन मरून फस्त जाहले असे तिचे
अता गिऱ्हाइके कुठे, अता न ती जवानही
जिणे शवाहुनीच त्रस्त जाहले असे तिचे

मिळेल भीक त्यावरीच अर्चना जगे अता
मुलांकडे बघून फक्त अर्चना तगे अता
दलाल, बायडी तिला न ठेवती घरातही
पती खुशाल मालही नवा नवा बघे अता