आई...!

जत्रेमध्ये गेलो होतो मी आईच्या बरोबर,
लहान होतो, नव्हते उमगत, उत्सुकता ती खरोखर !

जत्रा होती, हवशे, नवशे, गवशे जमले सारे
नवखी होती गर्दी मजला, नवखे तिथले वारे !

जत्रेच्या त्या गर्दीमध्ये झाला माझा घात !
आणि अचानक आईचा अन् माझा सुटला हात

'आई, आई' हंबरडा मी फोडला तिथे तेव्हा,
गर्दी जमली, पुसू लागली, 'काय जाहले? केव्हा? '

ओल्या ओल्या डोळ्यांनी मी शोधत होतो आई,
भासत होती आईसम अन् तेव्हा हरेक बाई !

गर्दीमधुनी एक माउली आली समोर माझ्या,
म्हटली, 'त्या तिकडे तुज आई शोधत आहे राजा'

घेऊन आली मजला ती माझ्या आईच्यापाशी,
दिसली आई, मिळाल्या मला आनंदाच्या राशी!

आठवतो तो प्रसंग, तेव्हा शहारते ही काया
काय जाहले? पुसती मजला कन्या आणिक जाया

दोघींमधली हसते आई, घेते जवळी मजला,
"का रडसी रे? मी आहे ना?" म्हणते आई मजला !