अजिंक्य

आपल्यापुढे न आपलेच चालते म्हणा
व्हायचे असेल तेच होत राहते म्हणा

माळलास चक्क तू गुलाब हात ताणुनी?
आजकाल जातपात कोण पाळते म्हणा...

मी न त्यास भेटतो, न देव भेटतो मला
भाउबंदकीत हे असेच चालते म्हणा

वाढले अमाप विश्व, पोचले कुठेतरी
पोरक्यास का कुणी लगाम घालते म्हणा

सावली उजेड पाहुनीच हाक मारते
स्त्री तिऱ्हाइतापुढेच लाज राखते म्हणा

वाघ व्हायचे मनात स्वप्न एक पाहिले
माणसात येउनी अजिंक्य वाटते म्हणा---------*

काय दंड द्यायचा उगाच जिंदगीस या?
मारल्यावरी मनास, देह मारते म्हणा---------*