सारे धुवून नेले ... बेभान पावसाने

सारे प्रदान केले बेभान पावसाने
सारे धुवून नेले बेभान पावसाने

दुलईत जाग येणे, आई मिठीत घेणे
ते शब्द कौतुकाचे, मी साठवून घेणे
ते दूध, बिस्किटे ती, तो रेडिओ जुनासा
खरखर समाप्त होता दे बातमी जरासा
बाबा म्हणायचे की आवर पटापटा रे
शाळेत जायचे ना? बसतोस का असा रे?
बाहेर पावसाची रिपरिप वाजणारी
हृदयात आळसाला कोंबून घालणारी
अंधारल्या पहाटे खिडकीमधे उभा मी
'बुडवून टाक शाळा' सुचवून पावसा मी
कोणी न ऐकणारे, मजला तयार करती
दप्तर गळ्यास लावुन ठेवी डब्यास वरती
छोट्या सिटावरी मी, नाराज होत बसणे
मागून सायकलवर बाबा बसून हसणे
'आई करेल टाटा' अंदाज मी करावा
अन रोज रोज तोही अगदी खरा निघावा
चाकामधे न जावो तो रेनकोट माझा
म्हणुनी धरून ठेवी बाबा बखोट माझा
ते थेंब पावसाचे चोरून भिजवणारे
रस्त्यामधील पाणी बाबांस दमवणारे
शाळेत पोचणे मी, मित्रांत पोचणे मी
बाबा निघून गेले विसरून टाकणे मी
वर्गात ओल थोडी, अंधार व्यापलेला
पहिलाच तास आणे इतिहास रापलेला
ती हुडहुडी जराशी, कंटाळणे जरासे
काढून एक खोडी, चेकाळणे जरासे
वर्गात शिक्षकांनी देणे समज कुणाला
पण पावसात तसल्या येणे समज कुणाला?
भरपूर देवघेवी सुट्टीमधे डब्याच्या
भाजी कुणी कुणाची, पोळ्या कुणी कुणाच्या
मैदान पावसाने तुंबून राहिलेले
खेळात बालपण ते गुंतून राहिलेले
स्मरते हिरावलेली ती शान पावसाने
सारे धुवून नेले बेभान पावसाने

ट्रेकिंगला निघावे रॉकेल, स्टोव्ह घेउन
चिवडा, पुऱ्या, पराठे सामान सर्व लेवुन
चिडवायचे कुणाला, रडवायचे कुणाला
मैत्रीत हेच चाले शिकवायचे कुणाला
वाटा चुकून जाणे, सामान खूप होणे
मैत्रीस साय येणे, ती सुस्वरूप होणे
खिचडी करून खाणे, थंडी विरून जाणे
थोडाच जाळ करुनी, सारे तरून जाणे
तितक्यात पावसाने तो जाळ ओलवावा
येऊन अडचणींचा दुष्काळ संपवावा
गाठून आसऱ्याला ते कुडकुडून जाणे
उब जी कमावली ती सारी झडून जाणे
सारेच एकमेका असती धरून आता
आलो उगाच येथे हे बडबडून आता
मैत्रीबिजास आता फोफावणे जमावे
दुसऱ्यास वाचवावे, आपण स्वतः भिजावे
पाऊस कोसळावा घेण्यास ही परीक्षा
आणी निघून जावा घेऊन मैत्र-दीक्षा
पाऊस आजही ती दीक्षा जपून आहे
मैत्रीच फक्त आता नाही टिकून आहे
पाऊस आज येतो, नाते जपून जातो
गतकाळ पाहिलेला तो आठवून जातो
रस्त्यात भेटले की करतात हात आता
आहे कुठे कुणाच्या हातात हात आता?
द्यावे पुन्हा अम्हाला ते दान पावसाने
सारे धुवून नेले बेभान पावसाने

ती लाजरी कबूली, देऊन मान झुकणे
हृदयात एवढ्याश्या लाखो तुषार उडणे
त्या विभ्रमांमधे मी, अन संभ्रमांमधे ती
त्या साहसांमधे ती अन योजनांमधे मी
ती टेकडी जराशी गावास दूर होती
पाहून प्रेम अमुचे लाजून चूर होती
एकांत त्या ठिकाणी गर्दी करून होता
संधीप्रकाश जेथे बस भरभरून होता
'होशील काय माझी' इतका सवाल होता
धजण्यास या जिभेचा पुरता नकार होता
अंती कसातरी तो केला सवाल मीही
हुंकारली कशीशी, पण बेमिसाल तीही
तो स्पर्श त्या वयाचा, तो काळ हरवण्याचा
सारे विरोध घरचे, फटक्यात जिरवण्याचा
आलिंगनात दोघे, सुटता मिठी सुटेना
येऊन पाहण्याला पाऊसही चुकेना
ती बावरून जाणे, मी शूर होत जाणे
बिलगायला मला ती मजबूर होत जाणे
मी आणखी तिला ते घेणे जवळ जरासे
युद्धात पावसाने होणे चपळ जरासे
हासून पाहणे मी ती हासणे जराशी
बेभान पावसाने ती त्रासणे जराशी
जाऊ घरी म्हणावे, तर मी नको म्हणावे
अन त्यात पावसाला भलते उधाण यावे
अन शेवटी ठरावे 'जाऊ निघून आता'
आभाळ येत आहे भलते भरून आता
रस्त्यात पावसाने गर्दी मुळीच नाही
पण एक ओळखीचा तेथे अम्हास पाही
कळले तिच्या घरीही, माझ्या घरी समजले
दरडावणी मिळाली, मारात अंग सजले
स्थळ पाहुनी ठरवले घाईत लग्न आता
फुलताच एक नाते संपून भग्न आता
झाली बरीच वर्षे, दिसते कधीकधी ती
'आहेस तू कसा रे' म्हणते कधीकधी ती
त्या टेकडीवरी मी जातो अजूनसुद्धा
त्या पावसामधे मी न्हातो अजूनसुद्धा
गल्लीत आमच्या ती येते कितीकवेळा
पाऊल थबकते पण दारी अनेकवेळा
ती भेट धुंद झाली साक्षीत पावसाच्या
ती भेट भग्न झाली साक्षीत पावसाच्या
केले खरेच त्याचे अनुमान पावसाने
सारे धुवून नेले बेभान पावसाने

संसार आज माझा आहे सुखात यारो
गतकाळ आजही पण येतो मनात यारो
प्रत्येक पावलाला पाऊस साथ होता
काळीज तोडण्याला पाऊस साथ होता
पाऊस आज येतो घेऊन त्या स्मृतींना
जागा मनात नाही काहीच विस्मृतींना
सांगायचे कुणाला? पटणार हे कुणाला?
पद्यात गुंफुनी मी हे सांगतो तुम्हाला
पाऊस माणसांनो बस चांगलाच नसतो
दिसतो तसा न असतो, तो वेगळाच असतो
केले मनास माझ्या बेजान पावसाने
सारे धुवून नेले बेभान पावसाने