एक थेंब मी सागरातला, लाट व्हायचे एकदा तरी
ढवळवायचे सागरास या अन् फुटायचे एकदा तरी
एकदा तरी या मनातल्या इंधनास मी चेतवायचे
जे घडेल ते या जगासही दाखवायचे एकदा तरी
रोज रोज हे पालकत्व का आपलेच मी सोसतो इथे?
बागडायचे, भरकटायचे, हारवायचे एकदा तरी
शेवटी कधी मी खराखुरा हासलो मला आठवेचना
वेळ काढुनी आठवायचे अन रडायचे एकदा तरी
रोज रोज मी यायचे इथे आणि जायचे मी निराशुनी
या जगासही मी निराशसे करत जायचे एकदा तरी