थांबतो आहे कसाई, मांस यावे आणखी
बोकडाला वाटते 'मीही जगावे आणखी'
मांजरी चाटे दुधाला, नासके, ताजे असो
संपताना हीच इच्छा की मिळावे आणखी
भिंत आली, गर्व गेला, वर्षं झाली आठशे
माउलीला हे कळेना 'काय व्हावे आणखी'?
वेळ गाडीला जरा, आगार आहे, थांबुया
लागली गाडी तरी वाटे 'बसावे आणखी '
आपल्या कळपातला मेला गवा वाघामुळे
भूक सांगे 'त्याच जागी पण, चरावे आणखी'
'पावसाचे चिन्ह नाही', दुःख शेताला असे
राजवाड्याचे तळे ओसंडवावे आणखी
घालते अंडी कुणी, सांभाळते अंडी कुणी
जो शिवे पिंडास त्याला काय यावे आणखी?