दिग्दर्शक विरुद्ध हिरो! प्रसंग - बागेत हिरॉईनचे चुंबन घेण्याचा!
दिग्दर्शकाला 'दि' व हिरोला 'हि' हे अक्षर आहे.
दि - हां! तु इथे असे उभे राहायचेस. ती धावत धावत येणार. तुला मिठी मारेल. तू तिचे चुंबन घ्यायचेस. साडे आठ सेकंदांनी मिठी सोडायचीस.
हि - बर! तिलाही सांगा.
दि - काय सांगा तिला?
हि - मिठी सोडायला.
दि - ते मी बघतो. तू सोडायचीस हे लक्षात घे आधी.
हि - साडे आठ सेकंद ?हे काय आहे?
दि - साडे आठ सेकंदाच्या चुंबनामध्ये एका जगाला मान्य नसलेल्या परंतु निष्पाप अशा प्रेमाची अधीरता स्पष्ट होते.
हि - म्हणजे नऊ सेकंद नाही चालणार तर!
दि - नाही. त्यातून अधीरता संपून अश्लीलता यायला लागते.
हि - अन आठ सेकंद?
दि - नाही. त्यात चोरटेपणा संपून वैवाहिकता यायला लागते.
हि - वैवाहिकता म्हणजे काय?
दि - विवाहानंतर अनेक वर्षांनी पती चुंबन जसे झटकन आवरते घेतो त्याला वैवाहिकता म्हणतात.
हि - कुणाचे चुंबन?
दि - पत्नीचे!
हि - साडे आठ सेकंद झाले हे मला कसे कळेल?
दि - ते तिला कळेल.
हि - पण मिठी मी सोडायचीय ना?
दि - 'ती सोडायला हवी असे तुला वाटावे' असे ती बरोब्बर साडे आठ सेकंदानी वागेल.
हि - ठीक आहे.
दि - हां! ती पाहा आली धावत!
हि - काय भीतीदायक धावते हो?
दि - बडबडू नको. धर ... धर!
हि - ह्यॅ! आपण नाही धरणार!
दि - अरे गेली ना ती धावत तुझ्या पाठीमागे? का नाही धरलंस?
हि - भीती वाटली. उधळल्यासारखी वाटली.
दि - आता पुन्हा प्रयत्न कर! ए बाई, तू जरा सावकाश धाव! हा घाबरला. हां! आली रे... आली बघ पुन्हा!
हि - अशी काय चालतीय?
दि - ए... अग चालतेस काय हळू हळू? पळ? हां! धर रे...
हि - अहो पोचू तर देत ना? ती त्या तिथे... मी इथे अन तुम्ही म्हणताय धर धर!
दि - पुन्हा प्रयत्न करा दोघे! हां! आली बघ पुन्हा
हि - अग्गाग्गाग्गाग्गा! मारलं हो मारलं! पिठलं झालं माझं ( जमिनीवर पडून )
दि - जरा हळू पळावे की? आपटला की तो?
हि - उठवा हो उठवा मला... अयायायायायाया!
दि - हे घे! पाणी घे!
हि - आपण नाही हिचे चुंबन बिंबन घेणार! तेवढ्यापुरता वेगळा हिरो घ्या!
दि - तसे नाही चालत! तिला हळू हळूच येऊदे का?
हि - तिला नकोच येउदे.
दि - अरे कथेत चुंबन आहे.
हि - मग मी आणि तुम्ही घेऊ! ही आणि मी नको.
दि - अरे हिरो हिरॉईनचे चुंबन आहे.
हि - नको नको!
दि - असे करतोस का? तु ये पळत पळत. ती थांबेल!
हि - मी पळतपळत येऊन पुन्हा धडक करायची?
दि - आता धडकायचे नाही. अलगद मिठी मारायची.
हि - ठीक आहे.
दि - हां! पळ आता. ती बघ तिथे उभी आहे.
हि - पळू का?
दि - पळ! ए ... ए ... अगं ए.. तू नाही पळायचेस आता. हा एकटा पळणार! आली इथपर्यंत! बघ हा मागे पळाला.
हि - ओ... तिला तिकडे उभी करा.
दि - गेली ती. ये आता तू धावत.
हि - ती हलतच नाही हो?
दि - ती कशी हालेल? नुसता पळापळीचा सीन नाहीये.
हि - हां! पोचलो मी!
दि - अरे मिठी मार ना?
हि - हां! मारली.
दि - असा का थरथरतोयस?
हि - ही हालवतीय मला गदागदा!
दि - ए ... तू नको काही करू.......... ए ... तू घे आता एक दणदणीत चुंबन!
हि - दणदणीत चुंबन? असे कुठे ठरले होते? ..........घेतले.
दि - यडचाप! ही काय भातुकलीय का? कपाळाचं कसलं चुंबन घेतोस?
हि - भुतुकलीय ही. ( मनांत )
दि - ओठांवर ओठ टेकव.
हि - ते टेकलेलेच असतात.
दि - स्वतःच्या स्वतःचे नाही. तुझे तिच्या...
हि - हां! टेकले.
दि - काय पक्षी आहात का शो केसमधले? जरा नैसर्गीक चुंबन वाटुदेत की?
हि - झाले साडे आठ सेकंद! ए... सोड की?
दि - तुला चुंबनात काही इंटरेस्ट नाहिये का?
हि - हिच्या चुंबनात नाहीये...
दि - ए बाई... तूच घे याचे चुंबन!
हि - अहो नको हो... नका असे करू...!
दि - चुंबन दिलेच पाहिजे
हि - चावतीय हो ही...?
दि - तो निष्पाप प्रेमाचा एक आविष्कार आहे.
हि - हा दाणगटपणाचा फुत्कार आहे हो...
दि - तू चेहरा जरा आनंदी ठेव.
हि - काहीही काय सांगता? इथे चाललंय काय अन तुम्ही सांगता काय?
दि - तुला चुंबन घ्यायची इच्छा आहे असा चेहरा कर.
हि - ए... स्सोड... स्सोड मला! स्सोड?
दि - अरे काय झालं?
हि - वेगळा घ्या वेगळा...
दि - काय वेगळा घ्या?
हि - हिरो वेगळा घ्या.
दि - का?
हि - मला निष्पाप वगैरे प्रेमं नाही करायची. आपल आहे ते बर आहे.
( हिरोची हकालपट्टी! संवाद समाप्त! )