मनासारखे होता कोठे तुझी आठवण येते?
जरा बिनसले काही की मग तुझी आठवण येते
नभात थोड्या विजा चमकल्या, सभा ढगांची भरली
सुकल्या धरतीवरती सरती लव थोडी थरथरली
एक शिरशिरी हवेस आली, माती वयात आली
भलती गर्दी जिकडे तिकडे घरी जायची झाली
मलाच हलता येईना मग तसाच बसलो होतो
खिडकीमध्ये तुझ्या दिशेला पाहत रुसलो होतो
दोष तुझाही नव्हता काही काम निघाले होते
सरीमुळे थांबलीस थोडी कामहि झाले होते
एक टपोरा थेंब कपाळावरती माझ्या पडला
आठीला हसताना आठीमध्ये घसरून पडला
एक थेंब मग लोचनातुनी चौकशीस आलेला
परधर्माशी गप्पा मारत शीण कमी झालेला
म्हणे "दुःख याच्या डोळ्यातुन सदाच कणकण येते
तिची आठवण गेली की मग तिची आठवण येते"
तू आली होतीस जराशी शिडकाव्यांना लेवुन
पावसास कायमची इच्छा, तुला भेटतो येउन
मातीला भारी पडणारा गंध तुझ्या अंगाला
अर्धी भिजली साडी चिकटे गौर गौर रंगाला
तशीच ठेवुन चहा टाकणे, भजी विकतची देणे
खिडकीमध्ये बरोबरीने चहा घोटभर घेणे
"कसला पाउस आला" म्हणणे, मला पाहुनी हसणे
हात मुलायम माझ्या कुरळ्या केसांवरती बसणे
"झोपतोस का थोडा" म्हणणे, मायेनी कुरवाळत
स्पर्श स्पर्श चेतवणारा हो अंगाला या जाळत
खिडकीपाशी पलंग अपुला, तिथे झोपणे दोघे
बोलत बसणे, काय कायसे ठरवत बसणे दोघे
मध्येच माझ्या तोंडावरती तीव्र वेदना पसरे
तू घाबरणे, तोंड तुझेही रडके होणे 'हसरे'
उठून माझे पांघरूण तू बाजूला करताना
नुकत्या गुडघ्यापुढच्या तुटल्या पायांना बघताना
मला पाहताना तू अश्रू पुसणे अन व्याकुळणे
तुला पाहताना माझी उध्वस्त लोचने गळणे
मनासारखे होता कोठे तुझी आठवण येते?
जरा बिनसले काही की मग तुझी आठवण येते
... तुझी आठवण येते