पहाटेची घडी

कूस घे बदलून आता ये नव्याने अंतरी
चंदनाचा गंध आला रेशमी कायेवरी

नाहताना आज साऱ्या कल्पना होत्या तुझ्या
अंग अंगातून माझ्या चेतना होत्या तुझ्या
जागजागी छेडणाऱ्या वेदना होत्या तुझ्या
तृप्ततेने घेत होते रंध्ररंध्रावर सरी
कूस घे बदलून आता....

दरवळे संभार माझा भोवतालाने तुझ्या
स्तब्ध झाला शेवटी आलिंगनामध्ये तुझ्या
आणखी बेभान झाला गंध स्पर्शाने तुझ्या
सोडला ताबा स्वतःचा होउनी मी कापरी
कूस घे बदलून आता ....

थंडला आवेग, आली ही पहाटेची घडी
हीच माझी वेळ, बाजी हीच माझी एवढी
जीव हा सर्वात या वेळेवरी माझा जडी
हा नवा आवेग, हे लावण्य माझे सावरी
कुस घे बदलून आता....