कविता..

लिहावीच कविता म्हणोनिया आज बैसलो ठाण मांडुनी ।
शब्द येत ना एकही पुढे, भागलो तयांशीच भांडुनी ॥

वृत्ते केली कैक मी तोंडपाठ
मात्रांसंगे कैकदा थैथयाट-
केला, किंतू काव्य काही न झाले
दुःखाने या, चित्त दुश्चीत झाले ।

आले वृत्त विशाल मानसि तरी, काही जमेना मला-
काव्याचे सहजी लिखाण करणे, अर्थानुगामी कला ।
हट्टाने करण्यास काव्य लढलो शब्दार्थ-वृत्तांसवे
तो ते काव्य हसे मलाच, वरती अन् वाकुल्या दाखवे ॥

बहू कष्टे आले मनि कितितरी शब्द, तरिही
कसे बांधू एका सहज कवितेतून न कळे।
बळे बांधू जाता, भयचकित होऊन बहुदा 
जसे आले तैसे परत फिरले शब्द सगळे ॥

मात्रावृत्त म्हणावे, तर मी होतो बराच थकलेला,
ह्या शब्दांनी होता, माझा भलता मोरू केलेला ॥

दिले सोडुनी 'छंद' सारेच, आणि
मनी ध्यायिला पूजिला चक्रपाणि ।
"तुझे चक्र, तैसी फिरो कल्पनाही-
मनातून" केली तया प्रार्थना ही ॥

शब्दांनी हे मनहि भरले, तुष्टला चक्रपाणि
वृत्तांसंगे सहज सुचले शबच्या शब्द आणि
झालो उल्हासित बहुत मी, डोळिया येत पाणी
'मंदा'ला या सुचलि कविता, जाहली धन्य वाणी ॥

(मंद) चैतन्य.