ललाटरेषा.

उन्हानं रापलेला कातळी चेहरा, पाझरणारं विदिर्ण मनं,
भेगाळलेली जमिन, पेरलेलं बियाणं हेच त्याच जिणं.

आशाळभूत नजरा टक लावून अस्मानाकडे तुझ्या स्वागतासाठी,
आनंदतो, आकाशी पडघम वाजू लागताच तुझ्या आगमनाची.

तुझा पहिला थेंब अलगद झेलतो चेहर्‍यावर,
तुझ्यात मिसळून जातो त्याच्या आसवांचा सागर.
एक गगनभेदी गर्जना, एक ठोकलेली आरोळी,
त्याचा अव्यक्त हुंदक्यातुन, त्याच्या हुंकारतुन देते तुला सलामी.

त्यानं वाकुन मुठीत घेतली त्याची माय, माती,
कपाळास लावली पाहून तुझ्याकडे एकवार आभाळी,
जणू ती सौभाग्य त्याचं अन तू ललाटरेषा.

ओंजळीत घेतो तुझं उदात्त दान "थेंबाचं",
धरतीच्या कुशीत नवी रुजवात करण्यासाठी,
नव्या स्वप्नांची, नव्या आशेची, भुकेल्या पोटासाठी.

भिजण्याचा आनंद देणारा, अनामिक हुरहूर लावणारा,
असाच भेटलास मला तू..... किती हे मर्यादीत?,
वलयांकीत... फक्त माझ्या परिघापुरतीच.

पण तू तर त्याच जगणं-मरणं...
त्याच "तळहातावरचं पोट"
"जे जगतं आणि जगवतं",
या पुढे कुठलं आलं अध्यात्म? कुठलं तत्वज्ञान?