आणले भानावरी खालावलेल्या प्रकृतीने
चालली होतीस केव्हाचीच तू माझ्या गतीने
उभयपक्षी कलम प्रस्तावात आले, मान्य झाले
'पाळुया याच्यापुढे कंत्राट दंडाच्या भितीने'
"आजही आहे तुला संधी कुणाचे व्हावयाची"
मी कुठे दिसलो तुला तर सांग हे माझ्यावतीने
कोण कोणाच्यामुळे या राहणीमानात आहे...
स्पष्ट झाले केवढे त्या एवढ्याश्या पावतीने
आज मागे पाहिले की वाटते झाले कसे हे?
शक्य दिसते काढणे आयुष्य माझ्या संगतीने
या समाजाच्यापुढे हा प्रश्न आलेला नसावा
व्हायचे कोणी कुणाचे का कुणाच्या संमतीने?
आजही होऊन गेली वेळ येण्याची तुझी बघ
आजही आकांत केला लोचनांच्या आरतीने
हा जमाना वैभवांचा, भेट देणे शेकडोंची
तो जमाना लाघवांचा, चकित होणे किंमतीने
एक पश्चात्ताप माझे पिंड आच्छादेल बहुधा
'वागणे जमलेच नाही एकदाही इभ्रतीने'
जो स्वतःबाहेर केव्हाही नसावा पोचलेला
तो जगावा वा मरावा, काय मागावे सतीने?
माणसे होती तशी सच्ची मनाने, ठीक आहे
जायचे आहे कुठे पण.. लाभलेल्या सद्गतीने?