क्षणक्षणी मरतो आम्ही जीवजंतू बापडे
वाकडे करतील काही भ्रांत तुम्हा का पडे ? १
सत्य नीती न्याय आत्मा सोडुनी गेले आम्हा
वाळल्या देहास संसर्गाची उरली का तमा ? २
मेलो तरी होई भले क्षणक्षणा मरण्यापरी
दुष्टतेशी झगडुनी आयुष्य हे हरण्यापरी ! ३
एवढी दुबळी नसे आमुची आयुष्यरेषा
भीत ना आम्ही अरे मृत्युच्या भयभीत वेषा ४
शाश्वताचा पिंड आमुचा मृत्युला कैसा मिळे ?
मृत्तिकेचा देह आमुचा सत्चिदानंदी फुले ! ५