भटक्या फिरतो आहे
इकडून तिकडे अन तिकडून इकडे
चकवा असा आयुष्याचा
फिरून पुन्हा तुझ्याकडे...
भटक्याचे रिकामे हात
सगळे तर देऊन झाले
अता उरल्या रेषा फक्त
एकट्याचे प्राक्तन सारे...
भटक्याचे पाय अनवाणी
काटे अन पायांखाली
रक्त संपले, वाहून गेले
काट्यांचीही हौस फिटली...
भटक्या गातो गाणी
आनंदी कधी विराणी
भटक्या गातो मनापासून
पाखरे मात्र उडूनी जाती!
भटक्याचे संगीत ऐका
ह्रदयाचा चुकलेला ठोका
पावलांचा थकला नाद
शांततेचाच फक्त आवाज...
भटक्या पावसात भिजतो
ओठी खारट चव
भटक्या उडतो वाऱ्यावर
गाल ओले सुकवतो...
भटक्याचा रस्ता चिखल
पाय फसला खोल
धडपड व्यर्थ भटक्याची
त्याचा जातोच तोल...
भटक्या पाहे क्षितिजापार
महाल तुझा परी दिसेना
नजर जरी थकली त्याची
रस्ता हा तरी संपेना...