पूर्वेस सूर्यराजा करतो सकाळ जेव्हा
मी घाबऱ्या मनाने येतो समोर तेव्हा
कळ एक कालचीही, डर एक आजचेही
भीतीविना मनाची होते सकाळ केव्हा?
कामात ताण आहे, नात्यांत ताण आहे
आयुष्य संकटांची अक्षय्य खाण आहे
पर्याय शोधणे मी केव्हाच सोडलेले
'चालायचेच सारे' इतकीच जाण आहे
नुसते क्षणाक्षणाला सांभाळणे प्रतिष्ठा
प्रत्येक ओळखीची झाली पचून विष्ठा
ना वाट जाणतो मी, ना ध्येय जाणतो मी
त्याच्यात काल निष्ठा, याच्यात आज निष्ठा
जेव्हा थकून रात्री आढ्यास पाहतो मी
आढ्याहुनी स्वत:ला निःशब्द भासतो मी
तक्रार पापण्यांची फेटाळतो जसा मी
माझ्यातल्या कवीला आधार वाटतो मी
दिवसातल्या चुकांची एकेक ओळ होते
अदृश्य आसवांची एकेक ओळ होते
या संपत्या दिसाची, रोरावत्या उद्याची
स्वप्नातल्या यशांची एकेक ओळ होते
ओळी रचून जेव्हा घेतो मिटून डोळे
प्रत्येक ओळ वाटे सोने हजार तोळे
येताच जाग, येतो पुर्वेस सुर्यराजा
ओळींवरून मग मी घेतो पुसून बोळे
ओळींवरून मग मी घेतो पुसून बोळे
-सविनय
बेफिकीर!