काहीतरी बदलायचे

सारे कधी बदलायचे?
का फक्त मी बदलायचे?

ठरलेच नव्हते आपले
केव्हा कुणी बदलायचे

राहून गेले शेवटी
वृत्ती जुनी बदलायचे

निष्ठा उगीचच ठेवली
काही... बरी बदलायचे

प्रतिभे तुझे आहे बरे
रोजी कवी बदलायचे

नावीन्य नाही राहिले
हे जन्मही बदलायचे

मी हा असा अन ती तशी
सांगा, कुणी बदलायचे?

कंटाळल्यावर देह, मन
काहीतरी बदलायचे

'बेफिकिर' होणे साधले
मीही कधी बदलायचे?