नुकताच तर शोध लागला
चंद्रावरती आहे पाणी
तिथे राहण्यासाठी चालू
झाली लगेच चाचपणी....
चंद्र बिचारा
मनी म्हणाला:
"इतक्या दुरुनी माझ्यावरती
कशास डोळा या पृथ्वीचा?
चैन माणसा पडत नसे का
बेत कशाला इथे यायचा?
दुरूनही मजला दिसते या
पृथ्वीवरची सगळी सृष्टी!
मुबलक सारे असूनही का
तिथली दुनिया दु:खी-कष्टी?
काही लोकांनाच मिळावा
इथे यायचा परवाना
कुणी कुणी यायचे इथे हे
मला विचारून ठरवा ना!
आहे फक्त काही कवींना
माझ्याबद्दल आपुलकी
चंद्रप्रवेशासाठी उघडा
त्याच कवींसाठी खिडकी! "...