ह्यासोबत
- मेवाडदर्शन-१: प्रस्तावना
- मेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू
- मेवाडदर्शन-३: दुसरा दिवसः माऊंट अबू
- मेवाडदर्शन-४: तिसरा दिवसः हल्दीघाटी व नाथद्वार
- मेवाडदर्शन-५: चौथा दिवसः उदयपूर
- मेवाडदर्शन-६: पाचवा दिवसः चित्तौडगढ, अजमेर
- मेवाडदर्शन-७: सहावा दिवसः पुष्कर, रणथंभोर
- मेवाडदर्शन-८: सातवा दिवसः रणथंभोर, चोखी धानी
- मेवाडदर्शन-९: आठवा दिवसः जयपूर
मेवाडदर्शन-२: पहिला दिवसः माऊंट अबू
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आमच्या प्रवासाच्या पहिल्या दिवशी आम्ही अरावली एक्सप्रेसने "आबूरोड"ला जाऊन पोहोचलो. तिथे सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी आम्हाला उतरवून घेण्याकरता एस-४ बोगीसमोर सज्ज असणार होते. आम्ही झपाट्याने तिथे जाऊन पोहोचलो. आता फक्त वाटच पाहायची होती. तेवढ्यात स्टेशनवर "आबू की रबडी" बोर्ड पाहिला. मेवाडदर्शन सहलीच्या पूर्वतयारीतच रबडी, घेवर, गजक, राजकचोरी इत्यादी फर्मास पदार्थांच्या आस्वादाची अपेक्षा तयार झालेली होती. म्हणून जेव्हा आम्ही आबूरोड स्टेशनवर "आबू की रबडी" बोर्ड पाहिला, तेव्हा लगेचच "आबू की रबडी" चाखून पाहण्याचा मोह झाला. पेल्याच्या आकाराच्या मातीच्या कुल्हडीतून "आबू की रबडी" घेतली. दर कुल्हडीस फक्त पंधरा रुपये फक्त. मात्र कुल्हडीत पाणी शोषल्या गेल्यामुळे की काय, पण रबडी अपूर्व लागत होती. मधुर, गोड आणि लच्छेदार. मन खूश झाले. बाहेर पडल्यावर, आबूरोड स्टेशनचे घुमट प्रेक्षणीयच दिसत होते.
दरम्यान, सचिन ट्रॅव्हल्सचे प्रतिनिधी श्री. सुशांत जोशी आणि श्री. शैलेश दोंदे, त्यांच्या टोप्यांसह तिथे हजर झाले. त्यांनी सर्व प्रवाशांना एकत्र आणले, त्यांचे सामान ताब्यात घेतले, आणि आम्ही ३५ आसनांच्या, २ x २, वातानुकूलित बसकडे वाट चालू लागलो. सगळे २१ प्रवासी आणि सहलप्रणेते बसमध्ये बसले, ड्रायव्हर किन्नरांचे इशारे झाले आणि बस माऊंट अबूची रमणीय वाट चालू लागली.
जेवणखाण आटोपून थोडीशी विश्रांती घेतली. संध्याकाळी सूर्यास्त बघण्याकरता आम्ही सूर्यास्तदर्शनस्थळाकडे निघालो. जिथे बस थांबली तिथून पाच मिनिटांवर ते आहे. मात्र तिथे एक अभिनव वाहन आम्हाला दिसले. ते म्हणजे बाबागाडी. मग एक खडक जणू हात जोडून स्वागत करतांना आढळला. आणि तिथवर पोहोचलो तेव्हा आढळली ती माऊंट अबूची सर्वोत्कृष्ट मिठाई. सोहन पापडी. ती मुळीच पापडी वाटत नव्हती. पांढुरक्या पिवळ्या रंगाची कापसागत किंवा "बुढ्ढी के बाल" वाटावी अशी साखरेची, अगदी तरलपणे तोंडात विरघळून जाणारी मिठाई. अतिशय हलकी. तिच्या, वाटीच्या आकाराच्या मुदी बनवून ठेवल्या होत्या आणि प्रत्येकी पाच रुपयांना एक अशा विकत होते.
मग सूर्यास्त पाहण्याकरता मोक्याची जागा हुडकण्यासाठी धावपळ सुरू झाली. सूर्यास्ताला आणखी अर्धा तास तरी असावा. मग तिथे आसपासच्या दृश्यांवरच चर्चा सुरू झाली.
तिथे खूप घाणेरीची झुडुपे इतस्ततः विखुरलेली होती. सुंदर फुलांचे घोस होते. शिवाय मिऱ्याच्या आकाराची काळी काळी फळेही गुच्छांनी लगडलेली होती. तिथल्या गप्पांतून, घाणेरीला फळे येतात ही नवीनच माहिती मिळाली. ही फळे खायला गोड लागतात. आरोग्यवर्धक असतात. शिवाय मूळव्याधीवरचा उत्तम उपायही ठरतात, असेही समजले. लगेचच स्वतः खाऊन, ती फळे खरोखरीच गोड लागतात याची खात्री पटवली.
इथे तत्काळ मेहंदी काढण्याकरता लाकडाचे साचे विकतही होते आणि तत्काळ मेहंदी काढूनही देत होते. अनेक महिलांनी सूर्यास्तापर्यंतच्या वेळाचा सदुपयोग तत्काळ मेहंदी रंगवून घेण्याकरता करून घेतला. निरनिराळे खाद्यपदार्थ हिरीरीने विकले जात होते. त्यामध्ये, द्रोणांत सोलून ठेवलेले डाळिंबाचे दाणे हा नवा पदार्थही विकायला होता.
मग सावकाश सूर्यास्त झाला. मात्र तो क्षितिजाआड सूर्य दडून नव्हे. कारण आकाश ढगाळ तर होतेच शिवाय धुकेही होते थोडेसे. त्यामुळे सूर्यास्त पाहण्याचा काहीसा विरसच झाला.
त्यानंतर "नक्की" तलावावर जायचे होते. नखाने निर्माण केलेला म्हणून "नखकी ताल" असे नावही कळले. पण अंधार आधीच पडू लागलेला असल्याने काही प्रवाशांना खरेदीत रस वाढू लागला होता, तर आमच्यासारखे काही प्रवासी अजूनही बोटिंगचा हुरूप बाळगून होते. म्हणून शिस्तीत वाटणी झाली आणि आम्ही बोटिंगला निघालो. सहा जणांची वल्हवायची बोट मिळाली, नावाड्यासकट. अर्धा-पाऊण तास पाण्यात विहरून मग आम्हीही खरेदीच्या सत्रात रुजू झालो. बांधणीच्या साड्या, सूट, कलात्मक शोभेच्या वस्तू, मोजड्या, परतल्यावर इतरांना वाटता येतील अशी स्मृती-चिन्हे, काय अन काय. प्रवासी खरेदीदारांचा माऊंट अबूमधील माल रोड, हा तर स्वर्गच आहे.
नरेंद्र गोळे
या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागत आहे.