हे वर्णन प्रवासात पाह्यलेल्या गोष्टींचं नसून प्रत्यक्ष प्रवासाचं आहे.
त्याचं असं झालं की एका टूरिस्ट कंपनीच्या गळाला आम्ही लागलो नि मी नि सौ नी तिच्याबरोबर १०-१२ दिवसांची परदेशवारी करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या सांगण्याप्रमाणे कागदपत्रांची नि सामानाची तयारी केली नि ठरल्या दिवशी रात्री ९ला घरून निघालो. विमानतळावर टूर लीडर हातात बावटा घेऊन उभा होता. त्यानी काही सूचना दिल्या नि आम्ही चेक-इन, इमिग्रेशन, सिक्युरिटी उरकून प्रस्थान द्वारापाशी येऊन ठेपलो. विमानाला बराच वेळ होता. त्यामुळे इतक्या लवकर घरून निघायची काय गरज होती ही सौ ची भुणभुण मधून मधून ऐकावी लागत होती.
रात्री अडीचला विदेशी कंपनीचं विमान उडालं. इकॉनॉमी क्लाससाठी या एअरकंपनीचं विमान म्हणजे मिळालेल्या जागेवर स्थानबद्धतेची शिक्षा होती. जागेवरून उठून मार्गिकेत यायला तऱ्हेतऱ्हेचे अंगविक्षेप करावे लागत. आठ-नऊ तासाच्या उड्डाणात दोनतीन वेळा नको इतक्या प्रमाणात खाद्यपदार्थ समोर आले. सीटजवळ असलेल्या टीव्हीवर दर १५-२० मिनिटानी मी आपलं विमान किती उंचीवरून उडतंय, त्याचा वेग किती आहे, किती अंतर अजून बाकी आहे, गंतव्यस्थानी किती वाजले असतील, हा तपशील पाहात होतो. शेवटी कंटाळ्याचाही कंटाळा आल्यावर आमची एअरकंपनीबरोबरची यात्रा संपली आणि आम्ही परदेशातल्या विमानतळावर उतरलो.
कस्टम, इमिग्रेशनचे अडथळे पार करून, सामान ताब्यात घेऊन आम्ही टूरिस्ट कंपनीनी व्यवस्था केलेल्या बसमध्ये बसलो. आता मस्तपैकी हॉटेलवर जाऊन, थोडं रिलॅक्स होऊन, फ्रेश होऊन प्रेक्षणीय स्थळं पाहायला बाहेर पडू असं आमच्यापैकी प्रत्येकाला वाटत होतं. पण नाही! कंपनीच्या आखलेल्या कार्यक्रमानुसार आम्ही थेट पर्यटनस्थळं पाहायलाच निघालो. त्या अवस्थेत आम्ही काय पाहिलं कुणास ठाऊक! पण दुपारी १२ ला भूक नसतानाही जेवण घेतलं. नंतर त्या शहरातील जायंटव्हीलमध्ये बसलो आणि त्यातून साधारण १०० मीटर उंचीवरून दिसलं तेवढं त्या शहराचं दर्शन घेतलं. सहप्रवाशांबरोबरच्या गप्पाटप्पात प्रवासाचा शीण जाणवत नव्हता. त्यानंतर बसकडे परतलो नि हॉटेलवर आलो. साडेपाच सहाला पुन्हा बसमधे. "तुमच्या उजव्या बाजूला अमुक आहे, डाव्या बाजूला तमुक आहे, समोर अमुक आहे", अशा धावत्या वर्णनानी शहराची तोंडओळख करून दिली जात होती. त्यात रस घेण्याचा प्रयत्न केला पण लक्षात काहीच राहात नव्हतं. मात्र त्यावेळी पुढच्या बारा दिवसात आम्हाला कोणत्या चक्रातून जावं लागणार होतं याची साधारण कल्पना आली. बरोब्बर सात वाजता, पुन्हा भूक नसताना संध्याकाळचं जेवण घ्यायला हॉटेलमध्ये गेलो.
नंतरच्या दिवसात आम्ही जे काय केलं त्याचं थोडक्यात वर्णन असं करता येईल : संध्याकाळी हॉटेलमध्ये चेक-इन करणं, बॅगा उघडणं, काही कपडे बॅगेत टाकणं, काही दुसऱ्या दिवसासाठी बाहेर काढून ठेवणं, बॅगा परत कुलूपबंद करणं, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करता येणार नाही म्हणून रात्रीच आंघोळ उरकून घेणं, साडेदहा अकराला झोपणं, सकाळी सहाला वेक-अप अलार्मनी उठणं, सातला चेक-आऊट व ब्रेकफास्ट, पावणेआठला बसमध्ये सामान चढवणं, आठला टूरलीडरच्या शिरस्त्याप्रमाणे बसनी प्रयाण करणं, बस थांबेल ते ठिकाण पाहणं, दुपारी बाराला जेवण करणं, पुन्हा बसमध्ये बसणं, बस थांबली की ठिकाण पाहणं, सायंकाळी सातला जेवण, त्यानंतर नवीन हॉटेलमध्ये चेक-इन, नंतर पुन्हा बॅगा उघडणं, ......
हुश्श!
एखाद्या लांबलचक स्वप्नाचे जसे अर्धवट तुकडे जागेपणी विस्कळित स्वरुपात आठवतात त्याप्रमाणे आमच्या ११-१२ दिवसांच्या सहलीच्या सबध बसप्रवासात पाहिलेल्या गोष्टी आठवतात. त्यांची डोक्यात इतकी सरमिसळ झाल्ये की त्याबद्दल संगतवार काही लिहिणं अशक्य आहे.
परतीच्या दिवशी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जिथे उतरलो होतो त्या विमानतळावर पोचलो आणि आमची स्वप्नवत परदेशवारी संपली. रात्री पावणेदहाला आम्हाला घेऊन पुन्हा त्याच एअरकंपनीचं विमान मुंबईला येण्यासाठी आकाशात झेपावलं. येताना विमानात झालेल्या गैरसोयीच्या व सहलीतल्या धावपळ नि दगदगीच्या पार्श्वभूमीवर परतीचा विमानप्रवास फारच सुखाचा वाटला.