निमित्त अगदी साधं झालं.
पण म्हणतात तसं,
सर्दी-खोकल्याचं निमित्त होऊन 'स्वाईन फ्लू'वर गेलं.
ख्रिसमस ईव्ह.
'कॉटन किंग'च्या बाहेर पार्क केलेल्या 'ऍक्टिवा'वर मी,
आणि अभी आतमध्ये.
का बरे?
नेहमीचंच.
ठोल्याला "अचानक" जपानला जायला लागतंय म्हणे.
आणि प्रत्येक ऑनसाईट फेरीला एक (तरी) नवीन शर्ट घेण्याची त्याची प्रथा.
सुरुवातीच्या काही वेळांनंतर हळूहळू
मला उमगायला लागलेला त्या प्रथेतला तोचतोचपणा.
आणि म्हणून 'ऍक्टिवा'वरची बैठक.
'आयपॉड'वर 'पॉप गोज माय हार्ट' ऐकत होते तिसऱ्यांदा.
एवढ्याएवढ्यात 'म्युझिक अँड लिरिक्स' पाचसात वेळेला तरी लागून गेला.
आणि प्रत्येक वेळेस मी पाहिला.
असो.
डोळे मिटून ऐकत होते निवांत.
तेवढ्यात धपाधपा पावलं वाजली.
'आले वाटतं आचरटाचार्य' म्हणून आयपॉड बंद करून मी डोळे उघडले.
तर जर्दलाल टीशर्ट आणि फेडेड ब्लू जीन्स घातलेली बावीस-तेविशीतली मुलगी
पाय रोवत चाललेली फूटपाथवरनं.
हातात निळा-करडा फोल्डर.
सावळ्या रेखीव चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा उत्साह,
आणि गगनभेदी किंकाळी.
"विव, वी मेड इट. बोथ ऑव्ह अस गॉट थ्रू. जॉइनिंग डेट फोर्थ जॅन. मायसोर ट्रेनिंग फॅसिलिटी"
समोर दुसऱ्या बाजूने विव प्रगटला.
उंचपुरा, गोराघारा, दणकट, स्वतःवरच खूष.
त्याने अचानक उचलली तिला.
अशी दचकले मी!
=====
कुणी मला टाईम मशीनमधून एकवीस वर्षं मागं नेलं की काय?
साडे एकवीस वर्षं खरंतर.
आमच्या वेळी प्लेसमेंटस जूनमध्ये होत.
यावर्षी रेसेशनमुळे उशीर झाला असेल.
तर साडे एकवीस वर्षांपूर्वी,
मी अशीच किंकाळी मारलेली,
आणि अभीने मला असंच उचललेलं.
'कोसिल'ने आम्हां दोघांनाही ऑफर दिलेली.
महिना साडेआठ हजार.
म्हणजे दरवर्षी लक्षाधीश!
=====
खरंच याच जन्मी घडलं होतं ते?
किती झपाट्याने बदलल्या गोष्टी.
लग्नानंतर वर्षाच्या आतच सलील झाला.
लगेचच अभीला एकट्याला (किमान) दोन वर्षांसाठी बॉस्टनला जायची ऑफर आली.
आणि माझी नोकरी सुटली.
"ही ऑफर न घेणे मूर्खपणाच होईल.
आणि मी नाही जाणार तिकडे एकटा.
सलीलला सोडून राहू शकेनही कदाचित.
पण सलीलच्या आईला सोडून नाही बा राहणार. "
किती सुखावले होते मी.
बॉस्टनमध्ये दोनाची पाच वर्षं झाली.
त्यात पूर्वा झाली.
बँक बॉस्टनचा प्रेस्टिजस प्रॉजेक्ट व्यवस्थित हाताळल्याबद्दल
अभी ग्रुप मॅनेजरसुद्धा झाला.
आणि आम्ही परत भारताय यायचा निर्णय घेतला.
=====
सलीलच्या मराठीला एव्हाना ऍक्सेंट यायला लागला होता.
आणि ते मला अजिबात पसंत नव्हते.
हुजूरपागेतली आई आणि पार्ले टिळकमधला बाप असताना
असं कसं चालेल?
अखेर माझ्या हट्टाला अभीने मान तुकवली.
पण परतताना नोकरी सोडली.
"धिस इज द राईट टाईम फॉर आंत्रप्रेन्यूरशिप.
वेब-बेस्ड ऍप्लिकेशन्स आर गॉन्ना बी द की"
आधीच ठरलं होतं की काय कोण जाणे त्याचं.
कारण परतल्यावर महिन्याभरातच ऑफिस सेट झालं त्याचं.
=====
एव्हाना माझ्या ज्ञानाला कोळिष्टकं लगडली होती.
पण आता आपलंच आहे म्हणताना मीही ऑफिसला जाऊ म्हटलं.
गेल्यावर दोन गोष्टी जाणवल्या.
एक म्हणजे माझ्या ज्ञानाला कोळिष्टकं लगडली असली,
तरी माझ्या विचारशक्तीला मात्र अजिबात लगडली नव्हती.
आणि दुसरी म्हणजे अभीला ते मुळीच पचनी पडलं नाही.
वेब-बेस्ड ऍप्लिकेशन्स म्हणजे काही जादूची छडी नव्हती.
आणि रिलायन्ससारख्या कंपनीचे व्हेंडर होण्याइतके बेभरंवशाचे दुसरी काही नव्हते.
हे मी नीट निरखून घेतले.
आणि स्पष्टपणे मांडले एकदा.
=====
कडाकडा भांडलो आम्ही.
मी सलील नि पूर्वाला घेऊन,
डहाणूकरमधल्या आमच्या इन्व्हेस्टमेंट फ्लॅटमध्ये राहिले तीन महिने.
बाबा कामाला परदेशी गेलाय असं सांगितलं मुलांना.
अभी तीन महिने संपताना आला.
अगदी परदेशातून आल्याच्या आविर्भावात.
आणि (माझ्यासाठी) त्याची कंपनी बंद केल्याची बातमी घेऊन.
'सत्यम'मध्ये प्रॉजेक्ट मॅनेजर म्हणून ऑफर आलीय अशी दुसरी बातमी घेऊन.
परतलो न काय प्रभात रोडच्या पंधराव्या गल्लीत.
=====
मागे वळून पाहताना आता वाटतंय,
की माझ्या करियरसाठीही एकदा स्वतःला असंच पणाला लावायला हवं होतं.
सहस्त्रबुद्धे सर कायम म्हणायचे,
"मुग्धा नोज मोअर, अभिराम शोज मोअर".
असो.
=====
प्रश्न आता पडलेत दोन.
एक म्हणजे,
आपण इकडे पंख हलवल्याने
तिकडे एवढे आवर्त निर्माण झालेय हे
त्या सावळ्या फुलपाखराला कधी कळेल का?
दुसरे म्हणजे,
वीस वर्षांनी त्या फुलपाखरावरही
पश्चात्तापाची वेळ येईल का?