भिकार सावकार

भिकार डाव, चला काव्य सावकार करू
उरू मरून, कहाणी सदाबहार करू

गुमान कैद बटेला जरा चुकार करू
तुझी बहार तुझ्याहुन बहारदार करू

जिथे तिथे दिसणे मी अता न सोसवते
चला स्वतःत स्वतःला अता फरार करू

मनास दोनच पर्याय, सांग काय करू?
तुझा विचार करू की तुझा विचार करू?

रदीफ मी नसणे, दैव काफिया नसणे
बघू... नवीन हयातीत हा करार करू

किमान भेट ठरव, वर्तने पुढे ठरवू
जबाबदार करू, बेजबाबदार करू

तुझा नसून तुझा हे गुपीत का उकलू?
स्वतः हुषार बनू की तुला हुषार करू?

सुखे खुशाल प्रवेशोत, पण अडोत व्यथा
मनात भिंत करू की मनास दार करू?

चिता रचून स्वतःची जळेल का नुसती?
चला जगात कुणालातरी तयार करू

कवी कसा नसतो 'बेफिकीर' हे कळुदे
गझल सुमार तरी शेर बेसुमार करू

-  भिकार डाव, चला काव्य सावकार करू