मी उगीचच तुझा पाहतो चेहरा
सावलीने तुझ्या भाजतो चेहरा
एकटा मीच नाही अताशा इथे
जो मला पाहुनी पाडतो चेहरा
जन्मभर शोधुनी भेटली तर म्हणे
पाहिल्यासारखा वाटतो चेहरा
मूळ मालाहुनी छान नकली तसा
आज माझा इथे गाजतो चेहरा
मी स्वतःला दिले एवढे चेहरे
चेहराही अता मागतो चेहरा
माणसे टाळती सत्य स्वीकारणे
आरसा का कधी टाळतो चेहरा?
कोणत्याही ठिकाणी तुला शोधतो
कोणताही तुझा चालतो चेहरा
सून माहेरला सोडते मन तिचे
सासरी एकटा नांदतो चेहरा
रात्रभर जोडतो भग्न अवशेष अन
मी सकाळी पुन्हा लावतो चेहरा