वेदनांची मोजणी, आत्ताच मी केली पुरी,
तो नव्याने घांव देण्या, घेतली कोणी सुरी.
विद्ध झाले झाड आतां, उन्मळाया लागले,
सोसवेना भार त्याला, पाहुणे पक्षी जरी.
जायचे होते तिला, जाणार ती होती तशी,
बोललो असतो तरीही! बोललो नसतो तरी!
कोरडे पाषाण त्याला, लाभले थडग्यासही,
ढाळते अश्रू कुणी, ही बातमी नाही खरी.
भास सत्याचा असा की, सत्य भासासारखे,
पाय मातीचे तिचे, जी वाटली होती परी.