खलाशी

नको वागूस सरिते नाविकाशी वेगळी
नदी काढेलसुद्धा हा खलाशी वेगळी

सुखाचे घास दैवा पारखूनी देत जा
अधाशी वेगळी हृदये, उपाशी वेगळी

नवी करशील का तू केशरचना आपली?
नकाराचीच पण... शैली जराशी वेगळी

पुन्हा आरंभले होते सुधारित वागणे
पुन्हा शिंकायला आलीच माशी वेगळी

कधी थांबायचे काळा कधी खुरडायचे?
गती घेतोस तू प्रत्येक ताशी वेगळी

मनाला गुंतवो केसात वा कापो गळा
कुठे या जन्मठेपेहून फाशी वेगळी?

तटस्थासारखे मी पाहतो होईल ते
असावी एक तेरावीच राशी वेगळी

कसे आतून आल्यासारखे ते वाटते
मला पाहून ती हसते जराशी वेगळी