बरेच दिवस माझ्या मनात दोन प्रश्न घोळत होते. त्यातला पहिला प्रश्न असा की,
- मानव आणि मनुष्य हे दोन शब्द सर्रास एकाच अर्थी वापरले जातात खरे, पण या दोहोत कांही फरक असावा कां? असेल तर तो काय? आणि दुसरा प्रश्न असा की,
- अनेकदा सरकारी प्रश्नावली भरताना राष्ट्रीयत्व ’भारतीय’ लिहिले जाते व 'जात' या सदरात 'हिंदू’ लिहिले जाते. भारतीय आणि हिंदू या दोन शब्दात मला विरोधाभास होत असतो. मी भारतीय आहे हे ठीकंय, पण मी खरेच हिंदू आहे कां?
या दोन प्रश्नांनी माझ्या मनात बराच नाच केलाय्.
काल कट्ट्यावर बैठक जमली होती. विषय निघाला ईश्वरी अवताराच्या कथांचे श्रवण करण्याचे प्रयोजन. यावर बोलणे चालू असताना मी पहिला प्रश्न मांडला. त्यावर सरधोपटपणे परमेश्वर, माया, पंचमहाभूते, त्यातून सृष्टीचे सृजन आणि मानवाची उत्पत्ती हे मुद्दे घेऊन वर्तककाका बोलले. साऱ्यांनी ऐकून घेतले. त्यावर पुन्हा एकदा मी माझा मुद्दा स्पष्ट केला की, 'मानव आणि मनुष्य या दोन शब्दात कांही फरक असल्यास सांगावा. ’ त्यावर ते म्हणाले, 'परमेश्वराने सृष्टीरचनेतील शेवटची एक आकृती साकारली. त्यात तो स्वतः शिरला. तो संतुष्ट झाला. 'आता नवे नाही ’, असे म्हणत त्याने त्या सचेतन आकृतीला 'मा-नव’ असे नांव दिले .' पण मनुष्य या शब्दाविषयी ते बोलेनात. सावंतअण्णा माझ्याकडे पाहात म्हणाले, 'तुम्हाला काय हवे आहे, ते मला सांगता येत नाही, पण ज्याअर्थी तुम्ही हा प्रश्न मांडला आहे, त्याअर्थी तुम्ही कांही तरी विचार केला असेलच. तुम्हाला काय वाटते? ’ सावंतांनी चेंडू परत माझ्याकडे टोलवून दिला.
मी मग माझे विचार सांगितले... 'ईश्वराने जी आपल्या कल्पनेला ज्ञात असलेली शेवटची आकृती तयार केली, ती ना मानव होती ना मनुष्य. पशूंच्या उत्पत्तीनंतरची ती एक प्रगत उत्पत्ती होती एव्हढेच. ही प्रगट सृष्टी जेव्हा संख्येने वाढली, तेव्हा त्या कळपाला काबूत ठेवण्यासाठी, त्याला शिस्त लावण्यासाठी, समाजबांधणीसाठी जे प्रयत्न होत होते, ते मनूने पुढे एकत्रित मांडले. ते स्वीकारल्यानंतर जी शिस्तीत वागणारी प्रजा तयार झाली, ती मानव-जाती झाली. विखुरलेले वेदवाङ्मय व्यासांनी जसे संकलित केले, त्याच प्रकारे मनुनीती संकलित केली गेली असावी. ही नीती अंगिकारलेले ते मानव. 'मनु्ष्य’ ही त्याच्या पुढची पायरी असावी, असे मला वाटते. 'उष्य’ म्हणजे प्रकाशण्याची, ज्ञान-पराक्रम-सत्कर्मांनी प्रगत होण्याची जिज्ञासा आणि क्षमता असलेले मन ज्याच्या ठिकाणी आहे, तो 'मनुष्य.’ ही पायरी विशेषतः व्यासोत्तर कालातली मानावी लागेल, कारण वेदांचे महत्त्व व्यासांनी अधोरेखित केले. श्रुती या वैचारिक तर स्मृती व्यावहारिक धर्म सांगतात, असे दिसते. व्यावहारिकतेला कालसापेक्षता असल्याने त्यात बदल होणे स्वाभाविक असते. मनुस्मृती या प्रकारातली आहे. आजही केलेले कायदे गरजेनुसार बदलले जातातच. म्हणून सारीच मनुनीती त्याज्य ठरत नाही. किंबहुना ती तशी त्याज्य मानली तर मानवसमाज पुन्हा एकदा जंगली जमात म्हणून जगूं लागेल. मला जो फरक उमजला तो, एव्हढाच!’
मग दुसऱ्या प्रश्नाविषयीही मला बोलण्यास सांगितले. मी माझे विचार पुढे मांडले. 'हिंदू शब्दाचा शोध घेतला, तर देवनागरी शब्दकोशात तो मिळत नाही. तो शब्द मिळतो इंग्रजी शब्दकोशात. सिंधू शब्दाचा अपभ्रंश हिंदू (पर्शियन भाषा) व त्यावरून हिंदुस्थान तर इंडस् वरून इंडिया अशी उत्पत्ती त्यात दाखविलेली आढळते. विशेषतः इंग्रजांनी त्यांच्या अमदानीत रूढ केलेला हा शब्द आमच्या इंग्रजाळलेल्या सुशिक्षित समाजाने स्वीकारलेला. बाबा वाक्यं प्रमाणम् या न्यायाने सामान्य जनतेनं तो वाची बाणवला. आता तर तो आमची जात दाखवीत आहे. तसे पाहाता सिंधू आता पाकिस्तानी झाली आहे. तेथील सिंधी जनताही विस्थापित झाली आहे. यामुळे आम्ही स्वतःला जेव्हा हिंदू म्हणून संबोधतो, तेव्हा मनात हा विचार आल्याशिवाय राहात नाही की, मी स्वतःला पाकिस्तानी असल्याचे सांगत आहे. खरे तर सिंधू प्रदेशातील रहिवाशी ही मर्यादित वस्ती होय. जी होती त्यांनी वैदिक संस्कृती स्वीकारलेली होती. इस्लाम धर्माचा उदय ही फार अलिकडची घटना होय. या धर्माचा आधार घेऊन अखंड भारताची फाळणी केली गेली ती एक तात्कालिक राजनैतिक सोय पाहाण्यासाठी. ही फाळणी स्वीकारणे हे भारतीयांना भाग पाडले गेले आहे, ते टाळता येत नाही. अशा परिस्थितीत मी हिंदू म्हणवून घेणे कितपत योग्य ठरणारे आहे? वास्तविक भारत हा शब्द किती अर्थपूर्ण आहे! भा म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश. त्या प्रकाशात रत असणारा तो भारत. भरत राजा इथे होऊन गेला, तोही भारत होता. भारत हे व्यक्तीवाचक पद जसे आहे तसे ते स्थानविशेष दाखविणारेही आहेच. मी भारतीय आहे, मला ज्ञानाची आस आहे, मला हे अभिमानास्पद असणे गैर नाही. मी गांगेय आहे, हेही म्हणता येईल, पण मी हिंदू आहे, हे मला तरी पटत नाही. माझा धर्म हा सनातन आहे, तो वैदिक आहे. तो साऱ्या धर्मांचा मूळ स्त्रोत आहे. आम्ही ही वस्तुस्थिती स्वीकारणार कां? दुसरा एक मुद्दा मनात येतो तो असा की, कांच सरळ कापण्यासाठी हिरकणीचा जसा वापर करतात, तसा इंग्रजांनी अक्कलहुशारीने हा हिंदू शब्द येथील समाजाचा विच्छेद करण्यासाठी वापरला. त्यांना अपेक्षित यश आलेही. पण, भारतीय समाजाचे फार मोठे नुकसान झाले. हिंदू शब्द आजही सोवळाच आहे. भाषावार प्रांतरचना, जातीनिष्ठ निकषांवर आधारित आरक्षण यातून समाज फाटतच चालला आहे. हा समाज पुन्हा एकदा एकात्म कसा होईल, ही चिंता विचारवंतांना पडली आहे. समाजाचा झालेला बुद्धिभेद सांवरायचा कसा?
माझा शेवटचा प्रश्न संपला... समोरचा चहावाला कटिंगचे ग्लास घेऊन आला. शांततेत चहा संपवून बैठक संपली. माझं मन मात्र थोडं हलकं झालं.
पण, आपल्याला काय वाटते?