वारीचे श्लोक

निघालाच वारीस तोडून कोंडी
करी रे पताका विठू नाम तोंडी  ।।१।।

कसा सर्व भक्तास उत्साह स्फूर्ती
दहाही दिशांना हरीचीच मूर्ती      ।।२।।

जमा सर्व ते पंढरी गाठण्यासी
महापूर तो कोपऱ्याकोपऱ्यासी  ।।३।।

हरीभक्त तललीन बेभान नाचे
विठू सावळा तोच डोळ्यात साचे ।।४।।

हरी राम कृष्णा हरी घोष गर्जे
हरीभक्त गाती सवे टाळ वाजे ।।५।।

तुकाराम सोपान माळीच भावे
नमावे जपावे गुरूसी भजावे ।।६।।

परीक्षाच घेतो खऱ्याची सदा तो
तरी ज्ञानदेवा लळा लावतो तो  ।।७।।

न लोभास जागा, न उगाच त्रागा
न द्वेषास थारा, न येतीच रागा ।।८।।

नसे मंदिरी तो, वसे अंतरी तो
फळे गोड सेवेकऱ्यांनाच देतो  ।।९।।

कुणी घेत माथ्यावरी मुर्त त्याची
कुणी घेत माथीच वृंदावनासी  ।।१०।।

दिसे माय ती दास होतीच दंग
पिताही असे तो सखा पांडुरंग  ।।११।।

कसा सावळा देव विष्णूच भासे
जनासी करे तो सदा आपलेसे  ।।१२।।

कपाळास टीळा, गळ्यालाच माळा
जपाचाच चाळा, मनी तो जिव्हाळा ।।१३।।

धरो पाय कोणी असे मान त्याला
धरी पाय तोही, नको श्रेय त्याला  ।।१४।।

जरी दूष्ट त्या सर्व शक्ती छळाया
धरी शेवटी मस्तकी तोच छाया  ।।१५।।

जरा पावले थांबती पायरीसी
स्मरा नामदेवा भजा चोखयासी  ।।१६।।

अहंकार नाही बडेजाव नाही
गरीबी अमीरी दुजाभाव नाही  ।।१७।।

कुटाळीस त्या तोंड ना वापरावे
तरी कौतुकाला कधी ना चुकावे  ।।१८।।

असे मुर्त  तेजोमयी ती हरीची
फिटे पारणे दिव्य जादू खरी ती  ।।१९।।

हवे ते नको ते तया सोपवावे
जसा पाहिजे तेव्हढा मोद पावे ।।२०।।

गुरू ज्ञानियांचा वदे तो हरीसी
जया जे हवे ते त्वरे तेच देसी  ।।२१।।

*जिव्हाळा (१३)तील जि दीर्घ होत असावा.
पण जिव्हाळा इतका चपखल बसतो की
उमाळा करावेसे वाटत नाही.