काळ माजला

काळ माजला! कवितेची खातो पानांवरती पाने!
माझी मस्ती! मी ही लिहितो दाबुन पानांवर पाने!

अशा कुवेळी जन्म घेतला! कसले काय न्‌ कसले काय!
बोलत राहू आपुले आपण, कळले काय न कळले काय!

इतके कानी पडती नाद! सूर आतला? कुठला काय!
अशातूनही बसतो लिहिण्या, सुचले काय न सुचले काय!

असे वाटते जमणे नाही, "प्रचीतीजन्य" लिहावया!
असेच काही शोभिवंत मग लिहिले काय न लिहिले काय!

तुझ्याभोवती फिरल्या कविता! गरगर-भोवळ आली बघ...
तुला जरी मी प्रत्यक्ष कधी शिवले काय न शिवले काय!