सांभाळ स्वतःला जरा...

दुनिया रंगीबेरंगी अन रंग तुझा पांढरा!

सांभाळ स्वतःला जरा...

बहुरूप्यांच्या गर्दीमध्ये तुझा चेहरा खरा!
सांभाळ स्वतःला जरा...

इथे कुणी नाही कोणाचे
जो-तो पाहे ज्याचे-त्याचे
दुनिया 'प्रस्थापित' आणि तू
आहेस इथे उपरा...
सांभाळ स्वतःला जरा...

विश्वास कुणावर टाकायाचा
हक्क कुणावर गाजवायचा
सोबत नाही येत कुणीही
ओलांडुन उंबरा...
सांभाळ स्वतःला जरा...

जगणे आहे तुझेच दुर्धर
प्रवास इथला आहे खडतर
मुक्त स्वतःला करण्यासाठी
तोड स्वतः पिंजरा...
सांभाळ स्वतःला जरा...