कधी वनवास सोसेना
कधी मधुमास सोसेना ...
मघाशी सावली वदली
उन्हाचा त्रास सोसेना ...
पुन्हा तू लाजली, आणि
मला संन्यास सोसेना...
जळाले कोंब ते सारे
ऋतुंची आस सोसेना...
अतां येणार ती आहे
जुना हा भास सोसेना ...
फुलांच्या पापण्या ओल्या
दंवाचा त्रास सोसेना ...
करू, पाहू, बघू, बोलू,
सदा उपहास सोसेना ...
गुन्ह्याची ह्या बदल शिक्षा
पुन्हा गळफांस सोसेना ...
जिण्याला मोडक्या, कारे
सुखाची आस सोसेना? ...
मला ही भाकरी जळकी
जगा सुग्रास सोसेना ...
अशी नाजुक, तिला माझा
जरा सहवास सोसेना ...
अतां मरताना जगण्याचा
खुळा हा ध्यास सोसेना ...