आनू कुटला उतारा?

अतिदुर्गम अशा आदिवासी प्रदेशात जेथे वैद्यकीय सुविधा पुरेशा
उपलब्ध नाहीत, अशा ठिकाणी आपल्या आजारी बाळाला एक
आई निजविण्याचा प्रयत्न करित आहे....

निज माज्या तान्या,
आता उतरलं ताप,
कोन करते करनी,
तेला लिंबाईचा शाप

रडू नग तान्या,
तुला चांदो दाविते,
गनीबाबाचा अंगारा,
तुज्या अंगी लाविते.

कुन्या भुत्याचीच बादा,
जवा असता अवस,
जाडाखालच्या वेतूला,
केला हाय म्या नवस.

देवळात हनम्याच्या,
घातलं हाय तेल,
रानातल्या शंकराला,
बी दिला हाय बेल.

कालीज तुज्यामंदी,
बापाचा एरजारा,
मी जाले एडीपिशी,
आनू कुटला उतारा?

रात सरलं ही आता,
असं रडायाचं न्हाई,
तुजं कपाल कोरन्या,
पुना एनार सटवाई.

- अनुबंध