मृगजळं

लवचीक अंतर जरी निरंतर,हळवे आपुले नाते ख़ास,
जवळ येईना दूर जाईना, तरी सुखावे खोटा भास.
भासामागे धावत जाता, मनात हिरवळ पायी आग,
बेधुंदित ना दाह जाणवे, स्वप्नी राहो नकोच जाग!

अशी बंधने हलके धागे, वार्‍यावरती फिरती विरती,
कधी हव्याश्या कधी नकोशा, गाठी त्याला आपसूक पडती,
नसता गुंता - ओढातान, अडकत जाते आपली मान,
तुला दुखावे मला दुखावे, असे मोकळे अंतर छान!

अनामिक हे भाव असुदे, अनाम असता अर्थ अपार,
अस्फुट राहो गुज मनीचे, का द्यावा शब्दांना भार,
तुला कळावे मला कळावे, असो वेगळा अर्थ तयांस,
कुरवाळु हे मृगजळ र्‍हदयी, सत्याहूनही सुखद भास...