..त्या क्षणाला ना कळे

मोडले नाते कधी ते बालकाला ना कळे
वाट पाहाते डहाळी पाखराला ना कळे

तोडता फांदी, घळाळा ढाळते अश्रूच ती
लाघवी ते वागणे, का? घात झाला ना कळे

ओतले आयुष्य त्यांनी हेच नाही जाणले
तोडले देठास कोणी, का, कशाला? ना कळे

मंगलाचा शोध घेती आज प्राणी पाखरे
आसरा आहे घरी हे, त्या क्षणाला ना कळे

आंधळा झालाच तो, कावाच हा ना ओळखे
प्रेम आहे की लबाडी, काळजाला ना कळे

आपले ते आपले कळले मुलाला आज आहे
सर्व का स्वार्थीच होते आज त्याला ना कळे?