एकदा ...!

एकदा शिशिरांस मी आधारले

व्यर्थ बहराने मला नाकारले ..!
       कोरड्या साऱ्या नभाच्या वल्गना
       शिंपुनी अश्रू पिकांना तारले ..!
का कुठे असते गुन्ह्याला ह्या सजा?
तु न देहा, तु मनाला मारले ..!
       प्राक्तनाच्या ह्या कथा ना वेगळ्या
       बघ ढगांनी सुर्यही अंधारले ..!
ना जरी वरदान मजला लाभले
शाप त्यांचे मी कधी नाकारले ..?
       रंग अश्रुंचाही झाला सारखा
       दुःख मी इतके सुखे गोंजारले ..!
नाचती भवती भुते सारी 'मिलन"
माणसां तू कोणत्या हाकारले ..?