आल्यावरती

दुःखच दिसले जगती जन्मून आल्यावरती
माझे घर अश्रूच्या बहत्या नाल्यावरती

शेणा मधले दाणे धुतले ढेकर आली
दुष्काळी तर जगतो आम्ही पाल्यावरती

अपमनाचे जीवन होते त्याचे इतके
लपला कबरीखाली , जगणे झाल्यावरती

स्वार्था साठी प्रेम करावे न्याय जगीचा
गायीलाही हिरवा चारा व्याल्यावरती

इतके पीतो लाज न उरली आता कसली
नाव लिही तू माझे साकी प्याल्यावरती

भटकून वळले सन्मार्गी जे मुजरा त्यांना
राम दिसेना श्रद्धा ज्यांची वाल्यावरती

गोपीमध्ये विश्व बुडाले कृष्ण हरवला
नजर कुणाची गोपाळांच्या काल्यावरती ?

आज शरीयत अमलाखाली अबला रडती
सुटका बघती  त्या दगडांच्या घाल्यावरती

"निशिकांताला" आज कळाले जगता जगता
प्रेम करावे हातावरच्या छाल्यावरती

निशिकंत देष्पांडे   मों. न. ९८९०७ ९९०२३
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतीक्षा