दृष्टीपथात आला तो तो शिकार झाला
आणिक तरी जिवावर जो तो उदार झाला
माझ्या तुझ्यात अलबत लेखी करार नव्हता
ओठास ओठ भिडले, मसुदा तयार झाला
माझ्याच आसवावर मी खार खात आहे
माझ्याहुनी तुझ्या जो पदरास प्यार झाला
विश्वासघात केला की फक्त चूक होती?
का नेमक्याच वेळी संयम चुकार झाला?
वाटायचे मला की जनरीत हीच आहे
म्हणतात लोक; काही भलता प्रकार झाला...