सूर
शारदेचा सूर आला
वाहला सर्वांमुखी
डोलली लहरींवरी
सारस्वताची पालखी॥
वारसा गातो अम्ही
त्या माउलीची लेकरे
आमचाही सूर मिसळे
धन्य झाली वैखरी॥
चेतना वाणीतली
जिव्हेतुनी शब्दाळली
नवरसांच्या अमृताने
धूळपाटी नाहली॥
बोचरा काटा कुठे अन्
पीसही अलवार ते
स्पर्श सारे एकवटले
या क्षणी एका स्थळी॥
बीज साहित्याचे प्रसवले
मूळ धरले फूल उमले
हुंगुनी गंधास दुरुनी
भ्रमरवीणा नादली॥
-मुग्धा रिसबूड
रचनाकाल : ३ ऑक्टोबर २०१०.