उरले नाही

माझ्या जगती माझे कोणी उरले नाही
यत्न करूनी दुःख मनी हे दडले नाही

मळणी झाली, पीक निघाले, शेत रिकामे
पक्षी गेले, इकडे कोणी वळले नाही

पाने गळता छाया देणे अवघड झाले
वठल्या झाडाखाली कोणी बसले नाही

चारा घेउन येता, घरटे निर्जन होते
भिरभिरत्या नजरेला कोणी दिसले नाही

साज घराचा इवले होते मोठे झाले
एक जमाना झाला कोणी हसले नाही

चालत आहे एकलपणच्या रस्त्या वरती
या मार्गाचा अंत कुठे हे कळले नाही

मायूसीच्या अमलाखाली शब्द हरवले
गजलेसाठी शब्द जुळवणे गमले नाही

उपयोगी मी उरलो नव्हतो या जगताच्या
अंतिम यात्री रडता कोणी दिसले नाही

भावविवश ना इतके व्हावे सत्य जरी हे
बेरड बनणे "निशिकांता"ला जमले नाही

निशिकांत देशपांडे    मोंअ. ९८९०७ ९९०२३
E Mail:--  nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा