शिंपडावे तू कधी

पेटलेल्या भवनांना शांतवावे तू कधी
पौर्णिमेच्या चांदण्याला शिंपडावे तू कधी

काय म्हणती लोक याची वाटते भिती तुला
होउनी निर्भीड स्वप्नी वावरावे तू कधी

टोचता पायात काटा नेत्र अश्रू गाळती
जाणुनी मम एकलेपण हळहळावे तू कधी

डोंगरावर उंच तू अन पायथ्याला मी उभा
श्रावणाच्या निर्झरासम खळखळावे तू कधी

खूप वर्षे जाहली मी चंद्र नाही पाहिला
चेहऱ्यावरच्या बटांना आवरावे तू कधी

बेरक्या माझ्या जिवाला ओढ क्षितिजाची असे
आपुल्या जाळ्यात मजला गुंतवावे तू कधी

आत माझ्या पाहता मज दिसतसे अंधार का ?
अंतरी नंदादिपाला पाजळावे तू कधी

लागते मजला समाधी गोड गाणे ऐकता
कोकिळा गावी म्हणूनी मोहरावे तू कधी

करपले आयुष्य सारे पान हिरवे ना कुठे
हस्त नक्षत्रा प्रमाणे कोसळावे तू कधी

का असा "निशिकांत" असतो झिंगलेला तुजमुळे ?
तोल त्याचा जात असता सावरावे तू कधी

निशिकंत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा