सहसा पडू नये

पुतळ्यास काढण्याची चर्चा घडू नये
वादात या कुणीही सहसा पडू नये

गांधी, सुभाष, बाबा मोठीच थोरवी
तुलना करावयाची आदत पडू नये

देईन मान दिसता बाबा कुठे गुरू
पाल्हाळ तेच त्यांनी पण बड्बडू नये

वृध्दास त्यागताना नवखी पिढी म्हणे
कोणाविना कुणाचे जगती अडू नये

खलनायकात दिसतो सदगुण कधीकधी
राखावया फुलांना काटा झडू नये

हुंडाबळीस आम्ही निर्ढावलो किती ?
हे रोजचेच झाले कोणी रडू नये

माता जरी कुमारी तिज मान्यता हवी
कचऱ्यात बाळ टाकुन तिमिरी दडू नये

का लिंगभेद जगती? कळले न मज कधी
बलवान पंख स्त्रीचे का फडफडू नये ?

"निशिकांत" कर तयारी जाऊ नव्या जगी
दलदल अमाप येथे वाटे सडू नये

निशिकांत देशपांडे मो.नं. :- ९८९०७ ९९०२३
E Mail :- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा