मायबोलीवर डॉ. कैलास ह्यांनी दिलेल्या मिसर्यावर लिहीलेली ही तरही गझल
लढेन षड्रिपुंसवे किमान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी
पहाड, जंगले, नद्या उदास सर्व भासती
वळून पाहशील का निदान एकदा तरी?
ढगांवरी जळून चंद्र, वायुला विचारतो
'मिळेल का मला तुझे विमान एकदा तरी?'
मदार केवढी तुझी उधार जिंदगी वरी
बघून यायचेस पण दुकान एकदा तरी
कळेच ना कशामुळे क्षणात बिनसते तुझे
करेन मी जगा तुझे निदान एकदा तरी
नकोस तू ! मला तुझा पुरेल फक्त भास ही
शमेल मृगजळामुळे तहान.... एकदा तरी
करायचाय एकदा असह्य छळ तुझा मना
बनेल काय देह अंदमान एकदा तरी?