नाते

तुजविण या जगाची, जाणीव होत नाही
नाते असे तुझ्याशी, माझे असेच काही

ना स्पर्शभावना ही, ना ही विकार काही
जरी हासते गुलाबी, ओठावरील लाही

असशील जेथ तेथे, काळीज धाव घेई
आकाश सावलीचे, होऊन नित्य राही

तू अप्सरा असो वा, कुब्जा; जरी तरीही
देहापल्याड प्रीती, माझी तुझ्यात
वाही

सारे तुझेच होते, तुज प्रेम जे दिले मी
आत्मा तुझा जुळा गे, मी फक्त
देहवाही

टाळून जा मला तू, कोणासवे महाली
हेतू तुझ्या सुखाचा, बाकी नकोच
काही