रक्तरंजित हात का ?

ज्यावरी मेंदी खुलावी रक्तरंजित हात का ?
जाळण्या जगता निघाली तेवणारी वात का

रात्र वैऱ्याची तरीही झोपलो नि:शस्त्र मी
गारद्यांनी जीवनाची मज दिली खैरात का ?

लाख होते संग साथी भोवती माझ्या सदा
सांजवेळी जीवघेणा भोगतो एकांत का ?

माझिया दु:खास कोणा वेळ आहे ऐकण्या ?
तेच रडगाणे उगा मी आज आहे गात का ?

चेहरा दावीन जगता मी जसा आहे तसा
गुदमरावे, मी लपावे मुखवट्याच्या आत का ?

वाटते तारुण्य यावे परतुनी मम जीवनी
मानवा पर्याय नाही टाकण्याचा कात का ?

ब्रीद जनसेवाच असते राज्यकर्त्यांचे म्हणे !
एक पक्षाने दुज्यावर मग धरावा दात का ?

वाजवी शासन तुतारी सर्व जनता सारखी
काल जनगणनेत माझी नोंदली मग जात का ?

झेप घे "निशिकांत" आता सोड वेड्या पिंजरा
लाभली उर्जा तुला जी कोंडली पंखात का ?

निशिकांत देशपांडे मो.नं. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा