रचल्या तुझ्याचसाठी

ह्रदयी अनेक लाटा उठल्या तुझ्याचसाठी
गजला अनेक सखये रचल्या तुझ्याचसाठी

चाहूल लागता तव दारी वसंत फुलतो
केसातल्या कळ्याही फुलल्या तुझ्याचसाठी

स्वप्नात कैद तुजला करण्यास रामप्रहरी
ग्लानीत पापण्याही मिटल्या तुझ्याचसाठी

बघताच दु:ख माझे होतील क्लेश तुजला
जाणून वेदना मम हसल्या तुझ्याचसाठी

दिसताच तू कुणाची लागेल दृष्ट म्हणुनी
पणत्या घरातल्या बघ विझल्या तुझ्याचसाठी

केला जगी दिखावा मी धैर्यवान आहे
तिमिरात पापण्या ह्या ओल्या तुझ्याचसाठी

श्रध्दा नसून आता मी मंदिरात जातो
देवास आणा भाका दिधल्या तुझ्याचसाठी

आधी कधीच नव्हतो मी चोर या जगीचा
पण काल चांदण्या मी लुटल्या तुझ्याचसाठी

"निशिकांत" भेटण्या तुज तीही अतूर दिसते
ओठात हास्यरेषा फुटल्या तुझ्याचसाठी

निशिकांत देशपांडे मो.न. ९८९०७ ९९०२३
E Mail :-- दुवा क्र. १
प्रतिसादाची अपेक्षा