तुझ्याविना मज हवा कशाला वसंत आहे?
तुझ्याचसाठी अजूनही मी जिवंत आहे
गुरू करावा मनात आला विचार माझ्या
सुमार सारे, सुपात्र कोठे महंत आहे?
करून धडपड निराश होता मनास आशा
कृपा कराया उभा सदा एकदंत आहे
कण्हूनये कोरडा बघूनी घरात शॉवर
तहान मिटणे खरी समस्या ज्वलंत आहे
निवांत राजे अशांत जनता उडेल भडका !
सचीव चमचे तयात कुठला सुमंत आहे
नमून बुध्दा विहार करता मला उमगले
खरा खरा तो महान झाला भदंत आहे
तिहार यात्रा करून येई तयास रुतबा
कसा मिरवतो! बनून राष्ट्रीय संत आहे
समोर जाताच आरसाही उदास होई
मलाच मीही कमी जरासा पसंत आहे
निवांत "निशिकांत"ला जगाया कधी न जमले
कलेवराला अपार आता उसंत आहे