शब्द जुळवता काव्याचे भांडार उघडले होते
भिजल्या गंधित ग़ज़लांनी मग रंग उधळले होते
मैफ़िल सजता वार्धक्याचे जोखड हलके झाले
मावळतीचा रहिवासी मज पूर्व गवसले होते
बेफिकिरीने तुडवित गेलो खाचा, खळगे, काटे
अश्रूंनाही शब्दफुलांनी मस्त हसवले होते
लाटाममागुन लाटा आल्या फेसाळत जोमाने
वेग असा की रूंद किनारे पार हरवले होते
विसरुन तिजला एकच क्षण मज झोप पहाटे येता
अलगद येउन झरत्या नेत्री स्वप्न सजवले होते
आठव फुलले आयुष्याच्या फांदी फांदी वरती
पदरी आठव गंधित भरण्या झाड हलवले होते
तेच धुके अन तेच हरवणे, चाहुल ऐकू येणे
बेचैनीतुन रिमझिम आठव लाख बरसले होते
व्यर्थ कशाला ग्वाही द्यावी चारित्र्याची कोणी?
संधी मिळता कैक जणांचे पाय घसरले होते
"निशिकांता" हसण्या रमण्याने अर्थ बहरती ऐसे
दु:खाशी विणलेले नाते पूर्ण उसवले होते