सावळी चैतन्यकळा-२

थेंबाथेंबातून आला
आला पाऊस कोवळा
चहूबाजूंनी धावला
मेघ सावळा सावळा

थेंबाथेंबाची ही साद
पाखरांच्या कंठी येई
स्वर आलाप सावळे
रानभरी मुक्त होई

थेंबाथेंबांचे हे गाणे
गाता गाता थरथरे
एका सावळ्या नादाने
आसमंत लुब्ध सारे

थेंब थेंब येता रानी
रत्न मोती झळाळती
पाचू सौंदर्य सावळे
अलंकार मुक्त होती

थेंबाथेंबांची कहाणी
नित्य सफळ संपूर्ण
सावळ्याच्या अंगस्पर्शी
झाली झाली परिपूर्ण

थेंबाथेंबांनीच केला
गुंता मोकळा कळेना
हिरवे का रान सारे
सावळे का आकळेना